पुणे : महापालिकेच्यावतीने डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारातील दहा एकर जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीयमहाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हे महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्याकरिता पालिकेने राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा पार पडला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास पालिकेला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यालक स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी मुख्य सभेने मान्यता दिली होती. आरोग्य विभागाने याकरिता सल्लागाराची नेमणूक केली होती. सल्लागाराने पालिकेला फिजिबिलिटी रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार, हे महाविद्यालय उभारण्यासाठी दोन मॉडेल समोर ठेवण्यात आले होते. महापालिकेने स्वत: हे रुग्णालय चालविणे किंवा ट्रस्टच्या माध्यमातून चालविणे असे दोन पर्याय होते. यातील ट्रस्टचा पर्याय योग्य वाटल्याने त्याला मंजुरी देण्यात आली होती. पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अहमदाबाद येथे जाऊन तेथील मॉडेलची पाहणी केली होती. त्यानंतर, ट्रस्ट स्थापन करण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली होती. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव महेश पाठक हे पुण्यात असताना महापालिका प्रशासनाने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी याविषयी सर्व माहिती घेतल्यानंतर या प्रस्तावाला मान्यता देत ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. --------आरोग्य विभागाने महाविद्यालया संदभार्तील तांत्रिक बाबींची पूर्तता करत शासनाकडे पाठपुरावा केला. उर्वरित तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या विधी विभागामार्फत ट्रस्ट नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. रुग्णालयाच्या उभारणीसाठी नेमलेल्या सल्लागाराला पुढील कार्यवाही व मान्यतेसंदर्भात सूचना देण्यात येतील असे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. ------ -------१. महाविद्यालयासाठी विविध प्रवर्गातील ५९५ पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडण्यात येणार. २. येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्याने ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे. ३. रुग्णालय उभारण्यासाठी महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला.
राज्य सरकारची पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 8:59 PM
डॉ. नायडू रुग्णालयाच्या दहा एकर जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार
ठळक मुद्देट्रस्टची होणार स्थापना