पुणे: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय यांसह राज्यातील अगदी बारीक- सारीक राजकीय, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी ते यावर आपली जी काही ठाम भूमिका आहे ती जाहीर देखील करतात. पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधण्याकडे त्यांचा कल असतो. पवारांचा हा स्वभाव माध्यमांना सुद्धा सुपरिचित आहे. पण आज पुण्यात शरद पवारांनी एका कार्यक्रमास्थळाहून घेतलेली एक्झिट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर पवार पत्रकारांशी संवाद साधतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र कर्जत-जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या रोहित पवार यांच्याशी त्यांची काहीतरी चर्चा सुरु होती. त्यावेळी अजित पवार इमारतीच्या आवारात बरेच दुरवर उभे होते.
यावेळी वसंत दादा शुगर इन्स्टिटयूट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेतील निर्णयासह राज्यातील विविध घडामोडींवर पवारांनी भाष्य करावे अशी विनंती पत्रकारांनी त्यांना केली. त्यावर पवार यांनी दूर उभे असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवत राज्य सरकार इथे आहे तेच बोलतील असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांकडे हाताचा इशारा दाखवायला ते विसरले नाही. यानंतर रोहित यांच्याबरोबर थोडा वेळ बातचीत करून ते नियोजित कामासाठी गाडीत बसून निघूनही गेले. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा निरोप अजितदादांना दिला. त्यानंतर अजित पवार पत्रकारांना सामोरे आले. पण याप्रकारे अचानक कार्यक्रमस्थळाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतलेली 'एक्झिट' मात्र चर्चेचा विषय ठरली.