राज्य सरकारचं कोरोनाकाळात पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष; आता महापालिकेला ५०० कोटी द्या : भाजपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:03 PM2021-03-31T17:03:34+5:302021-03-31T17:04:22+5:30
राज्य सरकारने पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून काही एक केलेले नाही.
पुणे : राज्य सरकारने पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून काही एक केलेले नाही. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने आजतागायत पुण्याकडे दुर्लक्ष केले आहे असा गंभीर आरोप पुणे भाजपने केला आहे. तसेेेच मदत करण्याऐवजी राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला ५०० कोटी रुपये द्यावे अशी मागणीही यावेेळी भाजपने केेली आहे.
पुण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
भाजप खासदार गिरीश बापट म्हणाले, आताच्या घडीला लॉकडाऊन कुणालाही परवडणारा नाही. आत्ता रडतखडत का होईना काही करता येत आहे. पण लॉकडाउन जाहीर झाला तर सगळ्यांनाच पूर्ण फटका बसणार आहे. केंद्राने मदत केलीये आता राज्यानेही करावी.कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्र मदत करत आहे आता राज्यानेही करावी.
आज एक रुग्णवाहिका दिली आहे. मात्र ,११ रुग्णवाहिकांची ऑर्डर मी दिली असून त्या राज्य सरकारच्या घोळात अडकलेल्या आहेत. अद्याप मिळालेल्या नाहीत. आम्ही राजकारण करत नाही आहोत. आम्ही मदतीचा हात पुढे घेवुन आलो आहोत. तर पुण्यावरचं संकट परतवुन लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहोत असेही बापट यावेळी म्हणाले.