पुणे : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊनमध्ये सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र आता सर्वत्र लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रकारचे दुकाने, मॉल, चित्रपट गृह सर्वत्र सुरु करण्यात आली असून फक्त विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता महाविद्यालये सुरू करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप) ने मंगळवारी ( दि.२ ) शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलने केली.
अभाविप च्या वतीने पुणे शहरातील विविध नामांकित महाविद्यालयात महाविद्यालय सुरू करावे यासाठी आंदोलन केली. दरम्यान स.प. महाविद्यालयात आंदोलन करत असताना पोलिसांकडून विद्यार्थी व अभाविप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत केवळ घोषणा करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप देखील अभाविपकडून करण्यात आला आहे. सामंत यांनी २९ जानेवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु आजतागायत महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्य दाखवत नाही. यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी आणि अभाविप कार्यकर्ते विविध महाविद्यालयात धडकले.
महाविद्यालये जर सुरु झाले नाही तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अजून प्रॅक्टिकल सुरु झालेले नाही. ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. मुळातच महाविद्यालयाबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार हे केवळ विद्यापीठाकडे असतात स्वायत्त संस्थेकडे असतात असे असताना या मध्ये हस्तक्षेप करून शासन अशा संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत आहे, या शब्दात अभाविपच्या कार्यकर्त्यानी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली.
राज्य शासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीच काळजी नाही. लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम हे शासन करत आहे महाविद्यालये सुरु करण्याबाबत लवकरात लवकर या शासनाने गांभीर्याने विचार करून सर्व महाविद्यालये पुढील २ दिवसात सुरु करावी अन्यथा अभाविप अधिक तीव्रपणे आंदोलन करेल असा इशारा प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी दिला.