पुणे - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन संभाजीराजे यांनी कठोर भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. यापूर्वीही, संभाजीराजेंनी सरकारला इशारा दिला होता, पण सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने त्यांनी आता 16 जूनपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट झाली. त्यावेळी, सरकारने सुपर न्यूमररीचा वापर करुन आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे म्हटले आहे.
पुण्यात मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले एकत्र आले होते. पुण्यातील औंध परिसरात जवळपास तासभर झालेल्या भेटीनंतर दोन्ही राजेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंनी आपल्या मागण्यांचा पुनर्उच्चार करत, राज्य सरकारच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरिबांना मिळाव्यात, पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करा, आणि 2185 विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या नियुक्त्या तात्काळ द्या... आमच्या या 5 मागण्या राज्य सराकरने लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत, त्यानुसार राज्य सरकार सुपर न्यूमररीचा वापर करु शकते. आजपर्यंत राज्यात सुपर न्यूमररी पद्धत वापरली गेली आहे. आता, शिक्षणातही वापरा, असे संभाजीराजे म्हणाले.
यापूर्वीच्या बैठकीतही सुपर न्यूमरेरीचा मुद्दा
यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमेवतच्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविणे आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या विषयांवर चर्चा झाली होती. मराठा समाजातील अभ्यासकांनी ‘सुपर न्यूमररी’ जागा वाढविणे कसे योग्य आहे, ते मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. या पद्धतीने जागा वाढविल्यास अन्य प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर सांगितले. त्यावर सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली होती.
दोन घराण्यांच्या भेटीचा आनंद
सातारा आणि कोल्हापूर या दोन घरांण्यांची एकत्र भेट झाल्याचा आनंद आहे. शाहू महाराज आणि अजित पवारांचा भेटीबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला. "शाहू महाराज आणि अजित पवारांची भेट झाली त्याबद्दल मला कल्पना नव्हती, ते आशीर्वाद घ्यायला आले असतील. मात्र, जर त्यातून काही निघणार असेल तर आनंद आहे." असं ते म्हणाले.
उदयनराजेंचा आंदोलनास पाठिंबा
उदयनराजे भोसले यांनी संभाजी राजेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले" आम्ही दोघं एकाच घराण्याचे. त्यांचा विचारांशी मी सहमत आहे. देशाची फाळणी करायची आहे का राज्यकर्त्यांना?राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही यासाठी जबाबदार. व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केलं नाही. आंदोलन वगैरे काय होणार? आरक्षण द्यायचं असतं तर ते मागेच दिलं असतं. "मात्र ते स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत का याबाबत मात्र, उदयनराजेंनी कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलं नाही.