पुणे: पुण्याजवळील फुरसुंगी येथे स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. एमपीएससीची अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्याने आणि नोकरी मिळत नसल्याच्या तणावाखाली येत आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांची राहत्या घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी वेगळा विचार करु नये. तसेच राज्य सरकार हे सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून चर्चेतून मार्ग नक्की निघू शकतो. खासदार या नात्याने मी पुढाकार घेऊन तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण विद्यार्थ्यांनी कसलाही वेगळा विचार करु नये असे आवाहनही त्यांनी केले. तसेच स्वप्निलच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेण्याची हमी दिली. स्वप्निलच्या बहिणीला एक मोबाईल देखील भेट देण्यात आला. तसेच तिच्या शिक्षणाची व नोकरीची हमी देखील घेतली. यावेळी सुळेंनी स्वप्नीलच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाची माहिती घेऊन पूर्ण निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी स्वप्निलच्या आई भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या,माझ्या मुलाने अनेकांचे जीव वाचविले, मात्र तो वाचू शकला नाही. राज्य सरकारने जर आठ दिवसांपूर्वी हे रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असता तर माझा मुलगा वाचणे शक्य झाले असते.