पाटेठाण : सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना भेडासावत असून, शेतातील उत्पादित होत असलेल्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे परिणामी दुहेरी संकटात सापडलेला शेतकरीवर्ग आज सरकारच्या उदासीन धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पाटेठाण येथे नवीन ग्रामसचिवालय व जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक वर्ष सत्तेत आलेल्या या सरकारने नुसतेच जाहिरातबाजी करून मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत असल्याचा दिखाऊपणा करण्याचा सपाटा लावला आहे; परंतु दुष्काळी परिस्थितीत होरपळणारा, शेतकऱ्यांसाठी कुठल्याही कर्जमाफी, तसेच हिताच्या विधायक योजना राबवल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले, की माझ्या आमदारकीच्या कालावधीत विकासकामासांठी कुठल्याही गटातटाच्या राजकारणाचा विचार न करता तसेच भेदभाव न करता निधी दिला; परंतु सध्या काही लोक झालेली सर्वच कामे आम्ही मंजूर केली असल्याची टिमकी वाजवत आहेत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी माजी आमदार अशोक पवार, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, पांडुरंग राऊत, बाळासाहेब थोरात, रोहिणी पवार, योगीनी दिवेकर, नितीन दोरगे, मानसिंग पाचुंदकर, ज्योती खळदे, विकास लवांडे, पाटील यादव, संदीप हंबीर, मनोज हंबीर, भाऊसाहेब ववले, मनोज ववले, शुभांगी थोरात, दिलीप हंडाळ उपस्थित होते. (वार्ताहर)
दुष्काळाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
By admin | Published: June 02, 2016 12:34 AM