पुणे : “येत्या फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावर फक्त ‘टाईमपास’ करायचा आहे,” असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“भाजपा सरकारच्या काळात केंद्र सरकारकडे सेन्सस डेटा मागितला होता. अध्यादेश काढून पाच जिल्ह्यांतील आरक्षण वाचविण्यात आले. मात्र, राज्य शासनाने १३ डिसेंबर ते ४ मार्च २०२१ या काळात मागासवर्ग आयोग का नेमला नाही? इम्पिरिकल डेटा जमा का केला नाही? सरकारने केवळ आदेश देऊन अहवाल दिला असता तरी ओबीसी आरक्षण रद्द झाले नसते,” असा दावा फडणवीस यांनी केला. इम्पिरिकल तपासणी चार महिन्यांत होऊ शकते. जर राज्य शासनाला हे करायचे नसेल तर आम्ही करून देऊ, असे ते म्हणाले. फडणवीस शुक्रवारी (दि. ९) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. अधिवेशन घ्यायचे असेल तेव्हाच ‘डेल्टा’ कसा येतो. अधिवेशनानंतर चर्चा थांबते तेव्हा कोरोना नसतो का? असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले. राज्य शासनाकडून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची आयुधे गोठविण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीला फासावर चढविण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे.
“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत सर्व जागा भरण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्यानंतर एमपीएससीच्या सदस्यांच्या जागा भरणार असल्याचे सांगितले. यावरून राज्य सरकार याविषयावर गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. एमपीएससीचा विषय एससीबीसीमुळे अडकल्याचा शासनाचा दावा चूक असून राज्य शासनाने आपली जबाबदारी झटकू नये,” असे फडणवीस म्हणाले.
चौकट
नरकेंनी पुरावे द्यावे
“पुण्यातील हरी नरके हे विचारवंत आहेत. परंतु, ते अर्धसत्य सांगत आहेत. ते ओबीसी समाजाचे प्रवक्ते म्हणून बोलण्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत,” अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली. नरके यांनी धमकावले जात असल्याची तक्रार सोशल मीडियात केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, “त्यांना भाजपाशी संबंधित कोणी जर धमकावत असेल तर तसे पुरावे त्यांनी द्यावेत. मी स्वत: त्यांच्यावर कारवाई करेन.”
चौकट
धनगर आरक्षणाचे काय?
धनगर आरक्षणासाठी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीतच आम्ही निर्णय घेणार होते. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने धनगर आरक्षणाबाबतचा नकारात्मक अहवाल पाठविला होता. पण त्याचे आम्ही राजकारण केले नाही. आमच्या सरकारने समाजाच्या बाजूने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते, असे फडणवीस म्हणाले.
चौकट
देवेंद्र फडणवीस म्हणाले...
-भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेतृत्व आहेत. मुंडे यांच्यावर तयार केलेला स्टॅम्पही कराड यांनी तयार केलेला आहे. भाजपामध्ये संपवा-संपवीचे राजकारण होत नाही. कराड यांच्या मंत्रिपदामुळे माझ्यापेक्षा अधिक आनंद पंकजा आणि प्रितम मुंडे यांना झाला असेल.
-मरणासन्न सहकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जीवनदान मिळाले आहे. अमित शहा हे सहकारातून राजकारणात आले. गुजरातमधील सहकारात शहांचे मोठे नाव आहे. त्यांच्या नावामुळे अनेकांना कापरे भरते हा भाग निराळा असला तरी, ते सहकारातही चांगले काम करतील.
-ओबीसी प्रश्नावर सत्ताधारी उघडे पडले आहेत. हा मुद्दा अंगावर येत असल्याने हा विषय केंद्र सरकारकडे सरकविण्याचा प्रयत्न केला जातोय.
-शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या पंकजा मुंडे यांच्या कथित नाराजी संदर्भातील लेखावर फडणवीस म्हणाले, “राऊत यांना फार कळते, ते फार विद्वान आहेत, असे पत्रकारांना का वाटते?”