पुणे : यावर्षी राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यांत डेंग्यू रुग्णांची संख्या १० हजार ५५३ इतकी प्रचंड वाढली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. मुंबईमध्ये ३ हजार ५५६, ठाण्यात ७०४ आणि नाशिकमध्ये ६०६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या जास्त असणारे हे टाॅप थ्री जिल्हे ठरले आहेत, तर उर्वरित रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली आहे.
डेंग्यू हा पावसाळ्यात जास्त प्रमाणात फैलावणारा विषाणुजन्य आजार आहे. त्याचा फैलाव हा एडिस इजिप्टाय या डासांपासून हाेताे व ते डास साचलेल्या स्वच्छ किंवा घाण पाण्यात वाढतात. यावर्षी राज्यात साडेदहा हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने डेंग्यूचा धाेका वाढल्याचे दिसून येते. रुग्णालयांत येणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली आहे.
मलेरियाचेही ११ हजार रुग्ण
मलेरियाचेदेखील राज्यात प्रचंड रुग्ण वाढले आहेत. मलेरियाचे आतापर्यंत १० हजार ९७८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे गडचिराेली येथे असून, ही संख्या ४ हजार ५२५ इतकी आहे. त्याखालाेखाल मुंबई ४ हजार ५५४ आणि ठाण्यात ६५९ रुग्ण आढळून आले आहेत.
लेप्टाेस्पायराेसिसचे १,२८३ रुग्ण
राज्यात दूषित पाण्यातून पसरणाऱ्या लेप्टाेस्पायराेसिसचे १२८३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक १२१८, रायगड २५, तर ठाण्यात २८ रुग्ण आढळले आहेत. हा आजार रोगबाधित प्राणी मुख्यतः उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्यास हा रोग होतो.
अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अन् ताप
nडेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. यामध्ये अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे हे प्रमुख लक्षणे आहेत. तर रक्तस्त्राव हाेणे ही डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याचासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.
सुरुवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनी भागावर (हातपाय, चेहरा व मान) आलेल्या पुरळांवरून केली जाऊ शकते. परंतु रक्तचाचणीवरून खरे निश्चित निदान हाेते.