जेजुरी - मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती संभाजीमहाराज गौरव पुरस्कार २०१८ सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेते अंकुश चौधरी, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल वृत्तनिवेदक अजित चव्हाण यांना आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद तांदळे यांना जाहीर करण्यात आला आहे.छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सोमवार १४ मे २०१८ ला पुरंदर किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील, रोहित पवार, मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा एंत्रप्रेनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते अशोक समर्थ, पत्रकार चंद्रकांत पाटील, सुहास खामकर, संपादक नीलेश खरे यांनासुद्धा छत्रपती संभाजीमहाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यंदाचे मानकरी सिनेअभिनेते अंकुश चौधरी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत अभिनेते आहेत. अजित चव्हाण हे मराठीतील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करताहेत. साहित्यिक शरद तांदळे यांनी रावण या बहुचर्चित कादंबरीच्या माध्यमातून ठसा उमटवल्याचे सोहळ्याचे मुख्य आयोजक अजयसिंह सावंत यांनी दिली. या वेळी सागर जगताप, संदीप जगताप, संतोष हगवणे, गौरव जगताप, आनंद जंगम, मंगेश भिंताडे, ऋषिकेश चौधरी, अभिजित भंडारी, विशाल बारबाई, अमित सागर, हर्षद इंदलकर, गोपीचंद मेमाणे, मंगेश हगवणे उपस्थित होते.
राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 2:31 AM