पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात आरक्षणासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. राजाराम पुलावरील महालक्ष्मी लॉन्स येथे बैठक पार पडणार असून यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतच सर्व मराठा संघटनेचे प्रतिनिधी, आरक्षण अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचे असणारे १०२ घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकार मार्फत आज लोकसभेत येणार आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजीराजे राज्यस्तरीय व्यापक बैठक घेत आहेत.
१०२ घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण लढा नक्की कसा असावा याविषयी तज्ज्ञांशी चर्चा करून आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती मांडण्यात येणार आहे. पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. मागण्या आणि सध्याची स्थिती युती सरकार आणि महाविकास आघाडी यांनी राबवलेली आणि दिलेली आश्वासनांचा पूर्ण व्हिडिओ तयार करून मांडली जाणार आहेत.
प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीराजे यांना महिन्यात इतर मागण्या सोडवू असे सांगितलं होतं. मात्र अद्याप मागण्या सोडवल्या नसून आज सरकारनं दिलेल्या आश्वासनाला आज दोन महिने होत आले. फक्त आश्वासनामुळे मराठा समाज नाराज असल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील आंदोलनाचा मार्ग आज ठरणार आहे.