लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत साहित्याचे गाढे अभ्यासक सत्कारमूर्ती डॉ. रामचंद्र देखणे यांनी धरलेला ठेका, पालकमंत्री गिरीष बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार आणि सुधीर गाडगीळ यांची रंगलेली फुगडी..पाटील आणि बापट यांच्यात जमलेला राजकीय चिमट्यांचा खेळ अशा वातावरणात डॉ. देखणे यांच्या एकसष्टीचा सोहळा रंगतदार झाला. विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे गौरव समितीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरुषोत्तम महाराज दिंडीने केलेल्या वारकरी टाळ-मृदंगाच्या ठेक्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यावर डॉ. देखणे यांनी देखील ठेका धरला. ते पाहून बापटांनी देखील कमरेवर हात ठेवत त्यांच्या समवेत ठेका धरला. त्यानंतर बापट, हर्षवर्धन पाटील यांनी देखणे यांच्या समवेत फुगडी खेळली. पाठोपाठ उल्हास पवार आणि सुधीर गाडगीळ यांनी देखील फुगडी खेळत रंगत आणली. गेले काही दिवस पुणे आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर विविध टीका होत आहे. कोणी पालकमंत्री बापटांना शोधत आहे. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांवर केलेल्या वक्त्यव्याने अडचणीत आले आहेत. हाच धागा पकडत, हर्षवर्धन पाटील यांनी बापट परत येतील त्यामुळे त्यांचा फलक लावू नको, असे अरविंद शिंदेंना सांगितले होते अशी कोपरखळी मारली. तसेच सध्या काही नेत्यांची जीभ घसरत असल्याची आठवणही दानवेंचे नाव न घेता करुन दिली. त्यामुळे बापट काय बोलतात याकडे खचाखच भरलेल्या सभागृहाचे लक्ष लागले होते. काही उत्साही व्यक्तींनी निवेदक गाडगीळ यांना बापट बोलणार आहेत ना, अशी विचारणा देखील विंगेत जाऊन केली. अखेर, अध्यक्षीय भाषणात बापटांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, काही लोक मी आॅस्ट्रेलियातून येण्याची वाट पाहत आहेत. काही लोक मी कुठे घसरतोय याची वाट पाहत आहेत. मात्र, शेवटी तेच आम्हाला हात देतात. पुर्वी ते मंत्री असल्याने सभागृहात होते. आता ते काहीच नाही, असा टोला लगावत बापट यांनी आपल्यावरील चिमट्यांना उत्तर दिले. तत्पूर्वी, डॉ. देखणे यांना ज्येष्ठ निरुपणकार किसनमहाराज साखरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, तब्बल साडेचार फुटी मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर, अंजली देखणे यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. या शिवाय डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, उद्योजक हणमंत गायकवाड यांचा सत्कार विशेष करण्यात आला. ज्येष्ठ निरुपणकार किसनमहाराज साखरे, खासदार श्रीरंग बारणे, एअर मार्शल भूषण गोखले, अंकुश काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, गौरव समितीचे भाऊसाहेब भोईर, सचिन ईटकर, संकेत देशपांडे या वेळी उपस्थित होते.
राजकीय चिमट्यांत रंगले ‘देखणे’ कीर्तन
By admin | Published: May 13, 2017 4:38 AM