पुणे: पुरातत्त्व संचालनालयाच्या अंतर्गत असलेली पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व राज्य संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे प्रेक्षक व पर्यटकांसाठी आज 12 नोव्हेंबरपासून खुली करण्यात आली. याबद्दलची माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी दिली आहे.
ही संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्मारके खुली करताना काही मार्गदर्शक सूचना निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नॉन कन्टेनमेन्ट क्षेत्रातीलच राज्य संरक्षित स्मारके पर्यटकांकरिता खुली राहतील. सर्व राज्य संरक्षित स्मारकांवर गृह मंत्रालय, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोविड-19 च्या महामारीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. स्मारकास भेट देतेवेळी मास्क परिधान करणे व शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे.
राज्य संरक्षित स्मारकाच्या परिसरात किंवा भागात प्रवेशबंदी करण्याचा अधिकार संचालनालयाला असेल. परिसरात गर्दी करण्यास तसेच थुंकण्यास अथवा धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परिसरात फक्त अधिकृत परवानाधारक मार्गदर्शक व छायाचित्रचालक यांना पर्यटकांकरिता संचार करण्यास अनुमती राहील. कचरा करण्यास प्रतिबंध राहील.
आजारी व्यक्तींना स्मारक व परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. राज्य संरक्षित स्मारक व पुरातत्त्वीय स्थळ परिसरात असणारी बाके, आसन व्यवस्था, सार्वजनिक प्रसाधनगृह वेळोवेळी व नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्याच्या व्यवस्थेचे नियोजन विभागीय प्रमुखांनी दक्षतेने करावे, अशा सूचनाही वाहणे यांनी दिल्या आहेत.