मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७च्या एका जवानाला पोलीस वेलफेअर निधीच्या नावाखाली रसवंतीगृहात काम करावे लागत आहे. वास्तविक पाहता या जवानांची नेमणूक जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहे. मात्र नाईलाजास्तव दोन जवानांसह दोन सफाई कर्मचाऱ्यांना रसवंतीगृहात दिवसभर काम करीत आहेत. त्यामुळे समाजाची सुरक्षा करणाऱ्या रक्षकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याचा अजब नमुना नुकताच घडला असून, शुक्रवारी (दि. १२) सायंकाळच्या सुमारास रसवंतीगृहात काम करणाऱ्या एका जवानाची बोटे रसवंती गाळप यंत्रात अडकल्याने त्याच्या उजव्या हाताच्या बोटांना गंभीर जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारासाठी या जवानाला येथील पिरॅमिड रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना केल्या असून, याबाबत डॉ. समीर कुलकर्णी यांनी दौंड पोलीस स्टेशनला लेखी स्वरुपात पत्र दिले आहे.राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या परिसरात म्हसोबा मंदिरासमोर रसवंतीगृह सुरु आहे. सध्याच्या परिस्थितीत या रसवंतीगृहात दोन जवान उसाचा रस काढून तो विकण्याचे काम करतात तर साफसफाईसाठी शासनाचेच दोन सफाई कामगार आहेत. तेव्हा सदरचे रसवंतीगृह हे खासगी तत्त्वावर कुणाला तरी चालविण्यास दिल्यास निदान दोन व्यक्ती यावर पोट भरतील आणि राज्य राखीव पोलीस बलाला मासिक भाडे मिळेल. हे भाडे पोलीस कल्याण निधीसाठी उपयोगी पडू शकते. त्यासाठी पोलीस जवानांनी रसवंतीगृह चालविणे योग्य नाही.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ : निधीसाठी समाजरक्षकांची सुरक्षा ऐरणीवर
By admin | Published: May 15, 2017 6:42 AM