पुणे : अजितदादा पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय त्यांना असे वाटते की,सर्व काही केंद्र सरकारने करावे. मास्क काय किंवा पीपीई कीटसह औषधे काय, प्रत्येक गोष्ट केंद्राने द्यावीत.राज्याने आधी १० रूपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रूपये कमी करण्याची मागणी करावी. सगळं द्या द्या असं कसं चालणार? असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडी सरकारला दिला. कॉंग्रेसने इंधन दरवाढी विरोधात पुण्यात आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हा खोचक सल्ला दिला.
पुण्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्ह केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शहरातील कुलकर्णी पेट्रोलपंपावर घोडागाडी नेत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी राज्यात देखील ठिकठिकाणी काँग्रेसकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील आंदोलनात इंधन दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेची लूट करत आहे असा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, तसेच देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले याचा खुलासा करावा अशी मागणीही यावेळी काँग्रेसने केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना टोला... महापालिकेच्या छोट्या विषयावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी इतकी मोठी झाली की त्याचा कार्यकर्ता हसला तरी तो का हसला? किंवा तो का हसला नाही..अशा बातम्या होतात. काही गोष्टी मानवी स्वभावाला धरून आहेत. कार्यकर्त्याने म्हटले होते की तुम्ही दोन वर्षांसाठी पीएमपीएल म्हटले होते. देवेंद्र यांनी समजावलं पण त्याने राजीनामा दिला. त्या राजीनामा देण्यामध्ये एक तांत्रिक चूक झाली. हा राजीनामा मंजूर केला तर कायदेशीर समस्या उद्भवतील. महापौरांना हे लक्षात आणून देण्यात आलं. यावरून इतकं काय घडलं? लगेच भाजपमध्ये फूट अशा बातम्या आल्या. राष्ट्रवादीचे नवीन शहाराध्यक्ष यांनी पेपरबाजी केली..आपल्या पक्षाचे बघावे ना? आपल्या पक्षाबाबत रोज माध्यमांना सांगत जा. तुमच्यात काय वाद चालला आहे ते सांगा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी प्रशांत जगताप यांना लगावला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.