पुणे : नेहमीपेक्षा यंदा कडाक्याची थंडी अजूनही पडलेली नाही. येत्या शुक्रवारपासून (दि.१० ) हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होणार आहे, तर दुपारच्या कमाल तापमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत (दि.९) ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक आहे. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भ मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होऊन दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. तेथे पावसाची शक्यता नाही.
दरम्यानच्या पाच दिवसाच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊ शकते. परंतु त्यापासून महाराष्ट्रात साधारण २० नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता जाणवत नाही. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) पासून पुन्हा हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होऊन दुपारचे कमाल तापमानही सामान्य राहण्याची शक्यता आहे, असे खुळे यांनी सांगितले.