पुणे : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) राज्यात नव्या सातशे बस खरेदी करणार असल्याचे असे राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले.
साध्या, निमआराम आणि आरामदायी या तिन्ही प्रकारातील या गाड्या असतील, असे परब यांनी स्पष्ट केेले. राज्य परिवहन महामंडळाच्या विविध कामांच्या पाहणीसाठी परब शुक्रवारी (दि. १८) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
परब म्हणाले की, राज्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यातील सर्व डेपोवरील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. सध्या या डेपोवर फक्त महामंडळाच्या बससाठीच इंधन उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शासनाच्या विविध विभाग, खात्यांच्या गाड्या किंवा खासगी गाड्यांनाही या डेपोवर पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यातून महामंडळाला उत्पन्नाचे एक निश्चित साधन निर्माण होणार आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ.
प्रत्येक एसटी बसस्थानकावर प्रवाशांना मूलभूत सुविधा देणार असल्याचे परब म्हणाले. त्यांनी सांगितले की, फार ‘हायफाय’ नाही, पण राज्यातील प्रत्येक स्थानकावर प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी, फलाटावर आसन व्यवस्था आणि स्वछतागृह या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक डेपोला सूचना केल्या असून त्यांचे काम सुरू आहे.