पुणे : मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीच्या धडाची अघोरी पूजा करून त्याची राख विवाहितेस खायला घातल्याच्या प्रकाराची राज्य महिला आयागाने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून त्याचा अहवाल आयोगासमोर सादर करण्याचा आदेश आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्याला दिला आहे.
मूल होत नसल्याने महिलेला हाडांची राख खाऊ घालण्याचा प्रकार अघोरी तर आहेच; पण विद्येचे माहेरघर आणि जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करून आयोगास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितले.
व्यवसायात प्रगती होत नसल्याने हे अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.