भोर तालुक्यातील वडार समाजातील वेनवडी येथील शासकीय पडीक जागेतील दगडीखाणी सुरू करण्यासाठी परवानगी देऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना देऊन व्यवसाय मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष दीपक धोत्रे यांनी केली आहे.
भोर तालुक्यात पाचशे ते सहाशे वडार कुटुंबीयाची कोरोना या भयंकर साथीच्या रोगामुळे हातचे काम गमवावे लागले. यामुळे अनेकजण बेरोजगारीने हैराण झाले आहे. तरुणांचे शिक्षण कमी असल्यामुळे दगड फोडून घरसंसार चालवावा लागत आहे, तर कोरोनामुळे अनेकांना आसपासच्या गावात देखील मजुरीसाठी जाणे कठीण झाले आहे. तर ठेकेदारही आम्हाला कामावर घेत नाही. यामुळे वडार समाजात जीवनमरणाचा संघर्ष सुरु आहे
शासनाने या बाबींचा जाणीवपूर्वक विचार करुन वेनवडी येथील गट क्रमांक १८८ या पडीक शासकीय दगडखाणीमधील बांधकामासाठी लागणारी दगडे उचलण्याची परवानगी देऊन वडार समाजातील कुटुंबांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन न्याय द्यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन अध्यक्ष दीपक धोत्रे, हरिभाऊ खोपडे ,दगडू धोत्रे, किसन पवार यांनी केली आहे.