मंचर येथील एसटी बसस्थानकासमोर राज्यातील पहिले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम मोफत चाईल्ड केअर हे कोविड सेंटर लोकमान्य प्रतिष्ठान व बी फोर एस सोल्युशन संचलित शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्ता गांजाळे यांच्या संकल्पनेतून सुरू झाले आहे. खासदार राऊत यांनी ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केले. या वेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, गौरव गुप्ता, तहसीलदार रमा जोशी, जि.प.गटनेते देविदास दरेकर, संपर्कप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, नितीन गोरे, अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात, कल्पेश बाणखेले, सुजित देशमुख, सुशांत जाधव, संतोष गावडे,महेश घोडके,प्रवीण थोरात,स्वप्नील हिंगे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले की, संभावित तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका लहान मुलांना गृहीत धरण्यात आला आहे. यादृष्टीने आघाडी सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच आहे. मंचर येथे दत्ता गांजाळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने चालू केलेले राज्यातील पहिले चाइल्ड कोविड सेंटर उभे केले आहे. ते लहान मुलांसाठी फार महत्त्वाचे आहे. आपले सरकार कर्तव्य बजावत आहे. आपण राजकीय कार्यकर्ता या नात्याने समाजाची सेवा करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. सर्व कार्यकर्त्यांनी दत्ता गांजाळे यांचा आदर्श घ्यावा.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या कामाचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मागील दीड वर्षात प्रशासनाने कोरोना आटोक्यात आणण्याचे चांगले प्रयत्न केले आहेत. पुढील काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात या प्रकारचे चाइल्ड कोविड सेंटर उभारण्याचे काम हाती घेणार आहे. तहसीलदार रमा जोशी, अरुण गिरे,दत्ता गांजाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
राज्यातील पहिले असलेले मंचर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम मोफत चाईल्ड केअर सेंटरमध्ये सर्व उपचार मोफत होणार आहेत. लहान मुलांना घरच्यासारखे जेवण, खेळण्यासाठी अनेक प्रकारची खेळणी, पालकांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कोविड सेंटर चर्चेचा विषय झाले आहे. दोन दिवसांत येथे कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार आणि त्यांचे मनोरंजन केले जाणार आहे. मुलांना घराच्याबाहेर आहोत असे वाटू नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.