बारामती : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी (दि. २६ ) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्यातील महसूल कर्मचारीही सहभागी होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी माहिती दिली.
महसुल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे एमआयडीसी पाठोपाठ महसुल कामकाज देखील गुरुवारी ठप्प होणार आहे. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, यामध्ये १९८२ ची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरु करावी,व अंशदायी पेन्शन योजना बंद करावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता, अतिकालिक भत्ता व इतर सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत, ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ,शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन समितीच्या त्रुटी दूर कराव्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे धोरण रद्द करावे, सर्व संवगार्तील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवाव्या,आदी मागण्यांचा यामध्ये समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या मागण्यांसाठी राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत.राज्य सरकारी संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार महसूल विभागातील पदोन्नती नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल आदी कर्मचारी या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तारु, जिल्हा सरचिटणीस सचिन तांबोळी आदी उपस्थित होते. ————————————————————————