पुणे : राज्यातील राज्यातील शेतकऱ्यांनी आपला ‘भगवा’ आता अमेरिकेतही फडकावला आहे. अर्थात हा भगवा रंग डाळींबाचा आहे. राज्यातून व देशातून पहिल्यांदाच अमेरिकेत डाळिंब निर्यात करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध झाली असून यातून शेतकऱ्यांना किमान २५ ते ५० टक्के ज्यादा दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नाशिक, फलटण, सांगोला या परिसरातून सुमारे १४ टन डाळिंब अमेरिकेला २८ फेब्रुवारी रोजी निर्यात करण्यात आले.
भगवा डाळिंबाची प्रत आणि चव वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे यापूर्वी संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहाारिन आणि ओमान यासारख्या देशांमध्ये निर्यात सुरू आहे. या डाळिंबाला अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. ही निर्यात हवाई व समुद्र मार्गाने करण्यात आली. मात्र, हवाई भाडे समुद्र मार्गापेक्षा किमान सहा ते सात पट जास्त झाला. त्यामुळे ही निर्यात यापुढझे समुद्रीमार्गेच करावे असा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यासंस्थांनी घेतला. त्यानुसार पहिली प्रायोगिक निर्यात चाचणी करण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पहिली व्यावसायिक निर्यात अमेरिकेला करण्यात आली. यात नाशिक, फलटण, सांगोला या परिसरातील शेतकऱ्यांचे १४ टन डाळिंब अर्थात ४ हजार २५८ बॉक्स जहाजातून अमेरिकेत पाठविण्यात आले.
अमेरिका डाळिंबांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेतीलच कॅलिफोर्नियातील डाळिंब मोठ्या प्रमाणावर विकले जातात. तसेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तानातून देखील अमेरिकेत डाळिंब विक्रीसाठी येतात. मात्र, भारतातील डाळिंब पहिल्यांदाच अमेरिकेतील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. भगव्या जातीचा रंग आणि चव चांगला असल्याने भारतातील खासगी निर्यातदारांच्या मार्फत ही निर्यात करण्यात आली आहे. भगवा ही डाळिंबाची जात काढणीनंतर ५० ते ५५ दिवस टिकते. त्यामुळेच समुद्र मार्गाने पाठवण्यासाठी टिकवण क्षमता महत्त्वाची ठरली आहे. मुंबईतील बंदरातून अमेरिकेत पोचण्यासाठी ३७ दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतरही सुमारे वीस दिवस हे डाळिंब अमेरिकेतील बाजारात टिकून राहू शकणार आहे. त्यामुळेच ही निर्यात समुद्रीमार्गे करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम यांनी सांगितले. निर्यातीतून मिळणारा दर हा स्थानिक बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा चांगला असल्याने शेतकऱ्यांना किमान २५ ते ५० टक्के अधिक नफा मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आतापर्यंत देशातून डाळिंबाची युरोप व मध्य मध्यपूर्व आशियात सुमारे ९९ हजार टनांची निर्यात करण्यात आली आहे. पहिली निर्यात करताना मुंबईतील बंदरात वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल, अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.