पुणे : विनाशकारी रिफायनरी प्रकल्पामुळे बारसू येथील जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होणार आहे. यामुळे पुण्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांना, विविध पुरोगामी संघटनांना, डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात आली. याविरोधात राज्यव्यापी लढा देण्यासाठी दोन समित्या गठित केल्या आहेत. यानुसार आम्ही लढा देणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी बैठक झाली. पाटणकर म्हणाले, परदेशात असे विनाशकारी प्रकल्प केले जात नाहीत. आपल्याला इंधन, ऊर्जा हवी आहे. पण त्याबदल्यात निसर्गाचे नुकसान नकोय. बारसू येथे जैवविविधता संपन्न असा प्रदेश आहे. तिथे कास पठारपेक्षा सुंदर कातळशिल्प, सडे आहेत. त्यांचे महत्त्व खूप आहे. ते सर्व या प्रकल्पामुळे नष्ट होतील. हा लढा राज्यव्यापी करण्यासाठी एक राज्यस्तरीय बारसू रिफायनरीविरोधी लढा समिती आणि अभ्यास-संशोधन समिती गठित केल्या आहेत. येत्या १७ जून रोजी मुंबईत दोन्ही समितींच्या बैठका होतील. त्यातून पुढील लढा ठरविण्यात येईल.
विनाशकारी प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक, रिन्यूएबल एनर्जी करण्यासाठी आम्ही काही पर्याय सरकारला देत आहोत. ते राबवा आणि इंधन, ऊर्जा तयार करावी. निसर्गाची हानी करू नये. हा केवळ विरोधाचा लढा नाही, तर वैज्ञानिकतेचा आहे.डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते