ओतूर : येथील बसस्थानकावर गुरुवारी एसटीत चढताना प्रवाशांच्या पाकीटमारीच्या व गंठणचोरीच्या घटना घडल्याने परिसरातील प्रवासी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ओतूर येथील आठवडे बाजारात दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी येणाऱ्यांची संख्या असते. गुरुवारी पावणेचार ते चार वाजण्याच्या सुमारास शेवंता नामदेव ढवळे (वय ६४, रा. ओझर, ता. जुन्नर) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे गंठण चोरीला गेले. तर रेवूबाई भाऊ गायकवाड या महिलेचे गंठणचोरीचा प्रयत्न झाला. बऱ्याच प्रवाशांचे, महिलांच्या पर्स, पाकीटमारीच्या घटना घडल्या. शुक्रवारी अक्षय तृतीया सण असल्यामुळे गुरुवारच्या आठवडे बाजारात बाजारकरूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोऱ्यांच्या सत्रांंमुळे येथील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने याचाच फायदा घेऊन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ओतूर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून, ओतूरच्या आठवडे बाजारच्या दिवशी बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
ओतूर स्थानकात खिसेकापू, दागिने चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: April 28, 2017 5:40 AM