इंदापूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही नगरपालिका, युवाक्रांती प्रतिष्ठान व रोटरी क्लब आॅफ इंदापूर आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहभागातून गणेशमूर्ती विसर्जन हौद व मूर्तिदान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.प्रशांत सिताप यांनी सांगितले, की प्लॅस्टर आॅफ पॅरिसमुळे नैसर्गिक जलस्रोत, विहीर, तळे, ओढा, नदी यांचे होणारे प्रदूषण ते पाण्याद्वारे पोटात गेल्याने होणारे विकार टाळण्यासाठी गेल्या वर्षी ही योजना राबविण्यात आली होती. इंदापूरच्या मानाच्या ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या गणेशोत्सव मंडळासह ७० टक्के मंडळांनी विसर्जन हौदात, मूर्ती विसर्जन करून आम्हाला सहकार्य केले. शेकडो घरगुती गणेशमूर्तींचेही येथे विसर्जन झाले. पहिल्याच वर्षी इंदापूरकर गणेशभक्तांनी निसर्गाला संरक्षक ठरणारा हा उपक्रम उचलून धरला, असे ते म्हणाले. याही वर्षी नवीन सेंट्रल बिल्डिंगजवळ १०० फुटी रस्त्यालगत विसर्जन हौद तयार करण्यात येत आहे. सहभागी मंडळांना आयोजकांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे मानपत्र देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. रोटरी क्लब आॅफ इंदापूर, शिव प्रतिष्ठान, जयहिंद प्रतिष्ठान, मध्यवर्ती गणेश मंडळ, महात्मा फुले ग्रुप, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, लायन्स क्लब, शिवशंभो दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, लहुजी वस्ताद दहीहंडी संघ, यशोदानंद दहीहंडी संघ, व्यंकटेश दहीहंडी संघ, शिवा गृप नाका बॉईज इंदापूर शहर आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
इंदापूर शहरात मूर्तिदानाचा उपक्रम
By admin | Published: September 11, 2016 1:15 AM