पुणे - छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी उद्यानात बसविण्यात महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काही तरुणांनी रात्रीत उद्यानातील चौथऱ्यावर एक छोटा पुतळा आणून बसविला. ही बाब आज मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी लक्षात आली. त्यानंतर काही वेळापूर्वी पोलिसांनी हा पुतळा हटविला.
दोन वर्षापूर्वी या उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही संभाजी प्रेमींना हटविला होता. त्यावेळी संभाजी महाराज यांचा पुतळा उद्यानात बसविण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापालिकेकडून छत्रपती संभाजी उद्यानात महापालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठीच काम आणि चौथरा बांधून पूर्ण झाले आहे. एवढंच नव्हे तर जो पुतळा बसविण्यात येणार आहे. तो पुतळा देखील तयार आहे़ असे असताना काल मध्यरात्री अचानक काही जणांनी संभाजी उद्यानातील चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा एक छोटा पुतळा नेऊन ठेवलाय. हा पुतळा इथे नेऊन ठेवणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणाने त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतलाय आणि हा पुतळा इथून हलवल्यास गंभीर परिणाम होतील अशा आशयाचा मजकूर लिहिलेला कागद चौथऱ्यावर चिकटवलाय. खरे तर महापालिकेकडून बसवण्यात येणारा पुतळा भव्य असुन छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथाची रचना करतानाची प्रतिमा त्यातून साकारण्यात आलीय. येत्या काही दिवसांत या पुतळ्याचे अनावरण करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देखील मिळवण्यात आल्या आहेत.
याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा दोन वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर संभाजी उद्यानात महापालिकेकडून चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवले जातात. मात्र तरीही चौथऱ्यावर हा पुतळा नेऊन ठेवल्याने खळबळ उडाली. आज सकाळी हा पुतळा बसविल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी हा पुतळा तेथून हटविला.