पुणे - एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो. त्यात राजकीय नेते, समाज व सोशल मीडिया यामुळे अडथळे येऊ शकतात. या विलंब काळात आपल्याला खूप काही करता येऊ शकते. आपल्याला नक्की काय करायचे आहे आणि साधने कशी उपलब्ध करता येऊ शकतील याचा विचार करून समाजाने कृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘पोल व्होल्टिंग’ या खेळात शून्यातून सुरुवात करून उंच उडी घ्यायची असते. महत्त्वाकांक्षा ही एखाद्या संधीसारखी असून अडथळे आले तरी ते दूर करत अभ्यासपूर्णतेने कार्यरत राहायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ‘पोल व्हॉल्टिंग’ची संकल्पना स्पष्ट केली.पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) च्या वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रवी पंडित यांनी लिहिलेल्या ‘लीप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माशेलकर व रवी पंडित यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन केले. इस्त्राइलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का व सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया व प्रा. अमिताव मलिक उपस्थित होते.भारत ‘पोल व्हॉल्टिंग’मध्ये कुठे आहे? असे डॉ. माशेलकर यांना विचारले असता त्यांनी शासनाने कोणतीही योजना राबविण्यापूर्वी ग्रामीण भागातले वास्तव नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे याकडे लक्ष वेधले. नियोजनात केवळ सरकारवर अवलंबून राहू नये तर समाजानेही पुढाकार घ्यायला पाहिजे, असे सांगितले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.हे फक्त पुस्तक नाही तर महाभारत आहे. सर्वसामान्यांसाठी माहितीचा खजिना आहे. भारत चीनला कसा मागे टाकू शकेल यावर प्रकाश टाकणारे असेल असे वाटले होते. मात्र त्याहीपुढे जाऊन कल्पकपणे जगाचा स्वर्ग कसा बनविता येईल याची अनेक उदाहरणे मला या पुस्तकात पाहायला मिळाली.- अरुण फिरोदिया
अडथळे आले तरी कार्यरत रहा - डॉ. रघुनाथ माशेलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:30 AM