पुणे: परिवहन महामंडळाच्या व खाजगी ठेकेदाराच्या बसेसवरील चालक सेवक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याने बेशिस्त बसचालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. महामंडळाकडे प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी आणि सुचना येत असतात. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलुन बसेस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे यासारख्या तक्रारीचा समावेश आहे.
महामंडळाकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत येणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्याच्या द्दष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सुचना दिल्या आहेत. बस संचलन करतांना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस स्टॉपवर लगतच उभ्या करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे काटेकोर पालन करणे, भरधाव वेगाने बसेस चालवू नये अशा विविध प्रकारच्या सुचना या परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. सूचना देऊनही वरील नियमांचे पालन न केल्यास सदरील तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.