कोरेगाव भीमा : एक जानेवारीला कोरेगाव भीमालगत पेरणे फाटा येथे दरवर्षी लाखो भीमसैनिकांच्या वतीने विजयस्तंभास देण्यात येणारी मानवंदना अभिवादन कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच अभिवादन करून साजरा करू या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनसह इतर माध्यमातून करण्यात येणार आहे. दरम्यान आज रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी भेट देऊन घरीच राहून अभिवादन सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमानजीक पेरणे फाटा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभास आनंदराज आंबेडकर यांनी भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणी कंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, पेरणेचे सरपंच रूपेश ठोंबरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, यंदा कोरोनाचे आव्हान आहे. दरवर्षी अभिवादन सोहळा मोठ्या प्रमाणात येऊन साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरीच राहून अभिवादन सोहळा साजरा करावा.
कोरेगाव भीमानजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिन म्हणून साजरा केला जात असतो. या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भीमसैनिक येत असतात. मात्र, राज्यात कोरोनाचे सावट असताना या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकी वारी, गणेशोत्सव, नवरात्र, ईद, महापरिनिर्वाण दिन, कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपात साजरे करावे लागलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षीचा एक जानेवारी २०२१ रोजी होणारा विजयस्तंभ कार्यक्रमही जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, कोरेगाव भीमा विजयस्तंभ समितीच्या माध्यमातून प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमीप्रमाणेच येथेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनीही केले आहे.
चौकट
शासनाचे परिपत्रक जाहीर...
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार कोरोनोच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दीवर निर्बंध असल्याने हा कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे दूरदर्शन तसेच इतर माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, येथे सभा व स्टॉलवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.
फोटो : पेरणेफाटा : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी भेट देऊन अभिवादन केले. या वेळी समता सैनिक दलाच्या वतीने सलामीही देण्यात आली.