राजानंद मोरे- पुणे : ससून रुग्णालयाच्या बहुप्रतिक्षित नवीन इमारत ' कोविड रुग्णालय ' म्हणून सज्ज होत आहे. या इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर तेथे सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी म्हणजे कोरोना वॉरियर्सचे विलगीकरण केले जाणार आहे. त्यांना घरी किंवा वसतिगृहात न पाठविता रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सध्या रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या गरजेनुसार व्यवस्था केली जात आहे.नायडू व ससून रुग्णालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नायडू रुग्णालयामध्ये ससून रुग्णालयातील काही निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर व परिचारिकाही तिथे सेवा देत आहेत. पण बहुतेक जण काम संपवून त्यांच्या घरी जातात. घरात जाण्यापूर्वी संपुर्ण दक्षता घेतली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. सतत कोरोनाबाधितांच्या संपर्कात असल्याने त्यांना लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही हा धोका आहे. त्यामुळे घरात जाण्यापुर्वी दक्षता घेणे आवश्यक असते. यापार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाने महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधितांच्या राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार हॉटेलमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.ससूनच्या नवीन इमारतीमध्ये ५० बेडचा अतिदक्षता कक्ष व सुमारे १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार केला जात आहे. तो कक्ष दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. तिथे काम करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सध्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या टीम तयार केल्या आहेत. एका टीमध्ये सुमारे ५० जण असतील. ही टीम किमान सात दिवस काम करेल. त्यानंतर त्यांची जागा पुढची टीम घेईल. सध्या २५० जण सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण व सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे काम सातत्याने सुरू आहे. नवीन इमारतीत काम सुरू झाल्यानंतर तेथील संपुर्ण ५० जणांच्या टीमची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जाणार आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था असेल. सात दिवसांनी त्यांची जागा दुसरी टीम घेईल. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनीही या माहितीला दुजोरा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ही व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.-----------------नवीन इमारतीमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सद्यस्थितीवरून इथे येणारे अनेक रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला असू शकतो. वैद्यकीय कर्मचाºयांना त्यांच्यापासून लागण होण्याचा धोका अधिक आहे. तसेच हे कर्मचारी घरी गेल्यानंतर त्यांच्यापासून कुटूंबातील सदस्यांना लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना हॉटेलमध्येच थांबवून ठेवले जाणार आहे. सध्याची आरोग्य विभागाकडील मनुष्यबळाची कमतरता पाहता ही दक्षता घेतली जाणार आहे. अधिकाधिक डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी उपलब्ध असावेत, यादृष्टीने हे पाऊल महत्वाचे आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर किंवा परिचारिकेला कोरोनाची लागण झालेली नाही.--------------
पुण्यातील ससून रुग्णालयामधील 'कोरोना वॉरियर्स' राहणार हॉटेल्समध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 6:00 AM
नायडू व ससून रुग्णालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
ठळक मुद्देससूनच्या नवीन इमारतीमध्ये ५० बेडचा अतिदक्षता कक्ष व सुमारे १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार रुग्णालय प्रशासनाकडून सध्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या टीम तयार एका टीमध्ये सुमारे ५० जण असतील. ही टीम किमान सात दिवस काम करेलनवीन इमारतीमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार