पुणे : वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, या हेतूने वाहतूक शाखेने कडक धोरण स्वीकारले असून १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७९ वाहनचालकांचे पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले आहेत. शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याला काही अंशी बेशिस्त वाहनचालकही कारणीभूत आहेत हे लक्षात घेऊन वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानुसार १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत वाहतुक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरवात केली. वाहतूक शाखेने १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या १ हजार ५०३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ३३८ जणांचा समावेश आहे़यामध्ये मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल भाडे नाकारणाऱ्यांची संख्या आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ३५ परवाने विचाराधीन असल्याची वाहतुक शाखेचे नियोजन विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी २७९ जणांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले असून त्यांपैकी बहुतेकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा किमान १ गुन्हा दाखल आहे. काही जणांवर २ किंवा ३ गुन्हे आहेत, त्यांचे पासपोर्ट अर्ज पडताळणी रोखून धरले आहेत. अशांवर आणखी काही गुन्हे आहेत का याची पडताळणी करुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा स्पष्ट उल्लेख करुन हे अर्ज पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय त्यांचे अर्ज फेटाळूही शकतात, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली़
रॉग साईटने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ४ तासात दोषारोपपत्रनो एंट्रीमधून वाहन चालकांविरुद्ध भारतीय दंडसंहीता २७९ या कलमान्वये वाहतुक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली. दरम्यान सोमवारी दत्तवाडी वाहतुक शाखेने रॉग साईउने येणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर अवघ्या चार तासांमध्येच संबंधीत वाहनचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २७९ या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील हे दत्तवाडी वाहतुक पोलिसांनी पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले़ व न्यायालयाने आरोपीला दंड केला आहे.