पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरुन पुणेपोलिसांनी मंगळवारी देशभरातील ७ ठिकाणी घातलेल्या छाप्यात ५ जणांना अटक केली़. मात्र, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याने पुणे पोलिसांना झटका बसला आहे़. गौतम नवलाखा यांच्या अर्जाची आज बुधवारी सुनावणी होणार असून सुधा भारद्वाज यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे़ . तोपर्यंत त्यांना पुण्याला नेण्यास विरोध केला असून त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़.३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते़. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या ५ जणांना अटक केली होती़. त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती़. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली चे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली़. फरिदाबाद येथील सत्र न्यायालयातून सुधा भारद्वाज यांना हजर करण्यात आले़. त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागण्यात आला़. न्यायालयाने तो मंजूर केला़.पुणे पोलिसांचे पथक त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच भारद्वाज यांचे नातेवाईक उच्च न्यायालयात गेले़. त्यांनी तातडीने हेबियस कॉर्प्स याचिका दाखल केली़. छत्तीसगडमधील ट्रेड युनियन कार्यकर्त्या आणि लोकशाही हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी सांगितले की, पोलिसांनी आपला लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह सर्व जप्त केला आहे़. त्याबरोबर सोशल नेटवर्किग साइटसचे पासवर्डही घेतले आहेत़. कोरेगाव भीमा अथवा एल्गार परिषदेशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगितले़. वकिलांच्या युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या ट्रान्झिट रिमांडला गुरुवारपर्यंत स्थगिती दिली़. आता यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे़. त्याचप्रमाणे नवलाखा हे मानवाधिकार हक्क कार्यकर्ते आहेत़. पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राईटस संस्थेचे सचिव आहेत़. पुणे पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या घरावर छापा घालून झडती घेतली़. त्यानंतर त्यांना अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर केले. पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रॉन्झिट रिमांड देण्याची विनंती केली़. न्यायालयाने ती मान्य केली़ . त्यावर त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली़. उच्च न्यायालयाने त्यांच्या ट्रान्झिट रिमांडला बुधवारपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे़. त्यावर आज सुनावणी होणार आहे़. तोपर्यंत त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़.