वेल्हे : किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथील पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून भिवंडी (ठाणे) येथील तरुण पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. भर पाऊस, निसरड्या वाटेतून पोलिसांसह स्थानिकांना मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी मोठी कसरत लागली. अजय मोहन कल्लामपारा (वय.३३) रा. भिवंडी, ठाणे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत होता. याबाबत सागर किसन माने वाशिंद ,शहापूर (ठाणे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
अधिक माहिती देताना सागर माने म्हणाले, ''अजय सोबत माझ्यासह चार असे मिळून पाच जणांचा ग्रुप शनिवार (ता. १४) रोजी किल्ले राजगड पाहण्यासाठी आलो होतो. दुपारी साडेतीन वाजता गडावर पोहचल्यानंतर किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने आम्ही सर्वजण येथील पद्मावती मंदिरात मुक्कामासाठी थांबलो.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मला जाग आली असता शेजारी झोपलेला अजय कल्लामपारा हा शेजारी नसल्याचे आढळून आले. आम्ही मंदिराच्या बाहेर शोधा शोध केली परंतु किल्ल्यावरती असणाऱ्या दाट धुक्यामुळे तो आढळून आला नाही. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाक्याजवळ अजयची चप्पल ,पाण्याची बाटली व टॉर्च आढळून आली. दरम्यान जवळपास असलेल्या पर्यटकांना बोलवून पाण्याच्या टाक्यांमध्ये शोध घेतला असता अजय मृत अवस्थेत आढळला, याबाबत वेल्हे पोलिसांना संपर्क केला.
वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे म्हणाले, गडावर एक पर्यटक पाण्याच्या टाक्यामध्ये पडला असल्याची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल पी.सी. सोमवंशी व आर .पी. कचरे होमगार्ड यांना घटनास्थळी पाठवले. कॉन्स्टेबल सोमवंशी म्हणाले, ''गडावर गेल्यानंतर अजय हा मृत अवस्थेत आढळून आला येथील पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, आकाश कचरे, विशाल पिलावरे, पवन साखरे, आर.पी. कचरे , पोलीस पाटील योगेश दरडीगे यांच्यासह स्थानिक नागरिक अक्षय दरडीगे, सुभाष जाधव ,प्रकाश ढेबे, राम खरात, बाळू जाधव, पांडू दरडीगे यांच्या मदतीने मृतदेह गडावरून खाली आणताना मोठी कसरत करावी लागली.
गडावर जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे निसरडी वाट त्यातच गडावरून खाली उतरताना निम्म्या वाटेत आल्यानंतर स्ट्रेचर तुटले. पुन्हा गडावरून स्ट्रेचर आणून मृतदेह खाली आणण्यास मोठी कसरत करावी लागली. दरम्यान वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. परमेश्वर हिरास यांनी दवाखान्यात येण्यापूर्वीच पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. याबाबत वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार योगेश जाधव करीत आहेत.