पुणे : बेभान मोटारचालकाने बेदरकारपणे गाडी चालवीत तब्बल पाच मोटारींसह एक रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता, की एका मोटारीच्या पाठीमागील सीटवर झोक्यात असलेले नऊ महिन्यांचे बाळ उडून समोरील काचेवर धडकून चालकाच्या मांडीवर आदळले. हा अपघात शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये घडला. पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. मिलिंद इंगळे (रा. काळेवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे याच्या मोटारीवर पाठीमागील आणि पुढील बाजूच्या नंबरप्लेटवर इंडियन एअर फोर्स असे लिहिलेले आहे. त्याच्या मालकीची मोटार घेऊन इंगळे दुपारी सव्वाचारच्या सुमारास बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येत होता. त्या वेळी चौकामध्ये सिग्नल लाल झालेला होता. इंगळेने त्याची भरधाव मोटार चौकामध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींमध्ये घातली. या दोन्ही मोटारींना धडक देत पुढे गेलेल्या इंगळेने आणखी दोन मोटारींना धडकून एक रिक्षा व दुचाकीला धडक दिली. दोन मोटारींना धडक दिल्यानंतर औरंगाबादहून आलेल्या एका मोटारीला पाठीमागून इंगळेची धडक बसली. या मोटारीमध्ये असलेले केदार परिदे, हर्षदा परिदे आणि त्यांचा मुलगा सिद्धेश (नऊ महिने) असे तिघेजण होते. चालकाच्या सीटवर केदार बसलेले होते, तर शेजारील सीटवर हर्षदा होत्या. सिद्धेशला त्यांनी पाठीमागील सीटवर ठेवलेले होते. पाठीमागून धडक बसल्यानंतर सिद्धेश उडून थेट पुढील काचेवर जाऊन आदळला. त्यानंतर तो केदार यांच्या मांडीमध्ये पडला. सुदैवाने त्याला मार लागला नाही. मात्र, हर्षदा यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे. रिक्षाचालकासह प्रवासी महिलाही जखमी झाली. अपघातानंतर वाहतूककोंडी झाली होती. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी रिक्षाचालकांची मदत मागितली असता त्यांनी नकार दिला. त्याच वेळी एका मोटारीमधील दोन महिला थांबल्या. त्यांनी जखमी हर्षदा यांना रुग्णालयात हलवले. नागरिकांसह वाहनचालकांनी तातडीने बचावकार्य केले. दरम्यान, पोलीस आल्यावर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
बेदरकार मोटारचालकाचा थरार
By admin | Published: April 02, 2016 3:39 AM