पुणे : मोडी लिपीच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात २५० पेक्षा जास्त जणांनी सहभागी होत मोडीची गोडी अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले, असे मत स्वप्निल धनवटे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिंडोरी प्रणित) यांनी आयोजित केलेल्या या वर्गाचे ऑनलाईन उद्घाटन शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. मोडी लिपीचे अभ्यासक धनवटे या वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत.
धनवटे म्हणाले, ‘मोडी लिपीचे बहमनी, शिवकालीन, पेशवेकालीन आणि इंग्रज अशा चार कालखंडांत विभाजन होते. या चारही कालखंडातील इतिहास, न्यायनिवाडे, राज्यव्यवहाराची पत्रे, आज्ञापत्रे, तह, स्वातंत्र्यसेनानींची कर्तबगारीची साक्ष असणारी हस्तलिखिते याच्या अभ्यासासाठी मोडी लिपी लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. नव्या पिढीला मोडी शिकण्याची अशी गोडी असेल तर शिकवण्यासाठीही उत्साह मिळेल.’