पुणे : शेअर बाजारसंदर्भात गाइड करणाऱ्या क्लासचालकावर सिंहगड रस्ता परिसरात तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही.
या हल्ल्यामध्ये नितांत नामदेव गायकवाड (२६, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड वडगाव बुद्रुक परिसरात राहायला असून, ते शेअर बाजार मार्गदर्शक आहेत. ते वडगाव बुद्रुक परिसरात शेअर बाजारासंदर्भात मार्गदर्शन करणारे क्लास घेत असतात. गायकवाड रात्री अकराच्या सुमारास घरी निघाले होते.
वडगाव बुद्रुकमधील कीर्तीनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गायकवाड यांना अडवले. त्यांच्यावर शस्त्राने वार केले. हल्ल्यात गायकवाड यांच्या हाताला जखम झाली. गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सांगितले.