पुणे : पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ते चोरी होऊ लागले आहे. पेठ येथील शेतकरी राम बुट्टे यांचा जवळपास ३५ पिशवी बटाटा चोरट्यांनी रात्री चोरून नेला.
बटाट्याचे आगर समजले जाणारे सातगाव पठार भागात बटाटे काढणी सुरू आहे. बटाटा पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे. परिणामी या परिसरात शेतक-यांचे काढलेले बटाट्यावर रात्रीच्या वेळी डल्ला मारत असल्याने शेतक-यांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पेठ येथील राम सीताराम बुट्टे यांच्या आरणीतील ३० ते ३५ बटाट्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्या. यामुळे त्यांचे जवळपास ५५ ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या बटाट्याला चांगला बाजारभाव मिळत असून प्रति दहा किलोस तीनशे वीस ते तीनशे पन्नास असा बाजारभाव मिळत आहे. या वाढलेल्या विक्रमी बाजार भावामुळे त्यांनी आपले लक्ष आरणी तील बटाट्यांना केले आहे. यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अरणीतील बटाटा पिकाचे राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.