नसरापूर (पुणे) : नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलिस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यातील जप्त कार घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना तरुणाने अटकाव करणाऱ्या पोलिसाच्याच अंगावर गाडी घालून दुखापत केल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत चोरट्यास ताबडतोब ताब्यात घेतले.
याबाबत संजय सुतनासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तुषार अशोक धाडवे (वय ३७, रा. सारोळा, भोर) याच्यावर सरकारी मुद्देमाल लांबविणे, कामात अडथळा करणे, आदी गुन्हे दाखल केले आहेत. नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यातील जप्त वाहने ठेवलेली असतात. यामध्ये अनेक प्रकारची जप्त वाहने आहेत. परंतु तुषार अशोक धाडवे (३७, रा. सारोळा) हा तरुण पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन कानोसा घेत कार (एमएच १२ एसएल ५७१९) मध्ये बसत असताना दिनेश देविदास गुंडगे (वय ४२) या पोलिस हवालदाराने धाडवे या तरुणास अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र उलट त्याने गाडी जोरात मागे घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी गुंडगे यांचे पोलिस सहकारी पप्पू शिंदे आणि सचिन भोसले यांनी प्रसंगावधान राखत गाडीला अटकाव करण्यासाठी गाडीच्या मागे पुढे मोठे दगड टाकून गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडी जोरात असल्यामुळे दिनेश गुंडगे यास दुखापत झाली. परंतु, तिघांच्या सामूहिक प्रयत्नांतून पोलिस ठाण्याच्या आवारातच युवकास पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.