टाकळी हाजी (पुणे) : मागील चार महिन्यांत शिरूर शहरातून स्विफ्ट व डिझायर कार चोरी जाऊन एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.
अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कारचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले. सर्व चोरी गेलेली वाहने ही अहमदनगरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने निष्पन्न झाले.
पोलिस नेहमी गुन्हा घडल्यानंतर चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेतात व मुद्देमाल हस्तगत करतात; परंतु यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन व सूचना करून चोरीच्या गाड्या कोणत्या राज्यात आहेत, याबाबत त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळविली. तपास पथक चेन्नई येथे पाठवून राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई, मासईनगर, तांबरम, चेन्नई), रवींद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर, यादवराज शक्तिवेल, रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर, तांबरम, चेन्नई) यांना ताब्यात घेऊन एक डिझायर कार हस्तगत केली.
त्यांच्याकडे मिळून आलेली कार आर सुधाकरण (रा. वेंडलुरू, कांचीपुरम, चेन्नई) याने दिली होती. त्या इसमास पुणे ग्रामीण पोलिस चेन्नईमध्ये असल्याबाबत चाहूल लागल्याने तो चेन्नई सोडून गेला असल्याचे समजले. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इसम नामे आर सुधाकरण यास शाहगढ, जालना परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने मागील चार महिन्यांत एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन त्याच्यामार्फत तीन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत. चेन्नई परिसरात विक्री केलेल्या चार कार एकूण तीस लाख रुपये किमतीच्या त्यामध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.