पुणे : जमीन व दुकानासाठी फायनान्स कंपन्या, व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या पैशासाठी तगादा मागे लागल्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी एका व्यापाऱ्याने साडेतेरा लाख रुपयांच्या जबरी चोरीचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यापाऱ्याने पोलीस चौकीसमोरच मोटार उभी करून अंगावर स्वत:च मिरचीपूड टाकल्याचेही समोर आले आहे.मांगीलाल नागारामजी देवासी (वय ४०, रा. आझादनगर, काळेवाडी) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने हा बनाव घटनेनंतर ६ तासांत उघडकीस आणला आहे. पिंपरी येथील बँकेतून काढलेली साडेतेरा लाख रुपयांची रक्कम दुचाकीस्वारांनी मोटार अडवून डोळ्यांत मिरचीपूड टाकून चोरून नेल्याची तक्रार देवासी यांनी सोमवारी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दरोडा प्रतिबंधक पथकातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मांगीलाल यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर, तसेच बँकेतील कर्मचारी व आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यानंतर माहितीत तफावत असल्याचे आढळून आले. त्यांच्या मोटारीला दुचाकीची धडक बसल्याने झालेले नुकसानही जुनेच असल्याचे त्या वेळी आढळून आले.या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी मिळालेल्या माहितीनुसार, मांगीलाल यांनी पाचपीर चौक येथे प्रॉपर्टी तसेच चिंचवड भागात एक गाळा, राजस्थान येथील मूळगावी जमीन घेतली होती. यासाठी त्याने श्रीराम फायनान्स, ए. यू. फायनान्स, लाखो रुपयांची भिशी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. या सर्वांनी पैस परत करण्यासाठी मांगीलाल यांच्या मागे तगादा लावला होता. यातून सुटका करण्याच्या उद्देशाने मांगीलाल यांनी त्यांचा मित्र मांगीलाल केसरजी प्रजापती (वय ३८, रा. यमुनानगर, पिंपरी) यांच्या मदतीने चोरीचा बनाव रचला. प्रत्यक्षात मांगीलाल देवासी यांनी स्वत:च्या घरातील मिरचीपूड सोबत आणली होती. काळेवाडी पोलीस चौकीसमोर मोटार उभी करून तिथेच आपल्या अंगावर त्यांनी मिरचीपूड टाकली. त्यापूर्वी त्यांनी मित्राकडे साडेआठ लाख रुपये दिले होते. दरोडा पथकाने अत्यंत शिताफीने हा बनाव उघडकीस आणून साडेआठ लाख रुपये हस्तगत केले. त्यांना पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कर्जातून सुटकेसाठी चोरीचा बनाव
By admin | Published: April 20, 2016 1:00 AM