इंदापूर : भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी निघालेल्या दहाचाकी ट्रकचे टायर फुटल्यामुळे तो पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडीच्या परिसरात पलटी झाला. अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालक व क्लिनरला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. या दरम्यान चोरट्यांनी ट्रकमधील जवळपास १ लाख ५६ हजार रुपयांचा कापड व केमिकल पिशवी ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण श्रीराम पाठक (रा.कालेर, आशापूरा सदन,ता. भिवंडी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी पाठक हे श्री श्रीनिवास रोडलाईन्स कंपनीत क्लार्क आहे. सोमवारी (दि.१६ एप्रिल)रात्री नऊ वाजता भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी त्यांच्या कंपनीमधून दहा चाकी ट्रक (क्र.एपी ०४ डब्ल्यू २१९९) निघाला होता. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाच्या बाजुचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महामार्गाच्या डाव्या बाजुला पलटी होवून पडला. यावेळी अपघातग्रस्त दहाचाकी ट्रकमधून १ लाख ५२ हजार ९५६ हजार रुपयांचे कापड व चार हजार रुपये किंमतीची केमिकलची पिशवी असा १ लाख ५६ हजार ९५६ रुपयांचा मालाची चोरी झाली. सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव अधिक तपास करत आहेत.
अपघातग्रस्त ट्रकमधून दीड लाखांच्या कापडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:04 PM
भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी दहा चाकी ट्रक निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडला.
ठळक मुद्देटायर फुटल्याने झालेल्या अपघातात महामार्गाच्या डाव्या बाजुला पलटी