प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलामध्ये उच्च रक्तदाबाचे निदान होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे वजन १ किलोने वाढले की वरचा रक्तदाब वाढतो. मुलांमधील सुटलेले पोट हा उच्च रक्तदाबाचा ‘अलार्म’ आहे. प्रगत देशांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दर वाढदिवसाला मुलांचा रक्तदाब मोजला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षी पोटाचा घेर ५० सेंटीमीटर असेल आणि १३ व्या वर्षी पोटाचा घेर ८० सेंटीमीटर असेल तर स्थूलता आहे, असे समजावे आणि पालकांनी दर सहा महिन्यांनी मुलांची उंची, वजन आणि रक्तदाब तपासावा, असे डॉक्टरांनी सुचवले आहे.
भारतात सर्वाधिक मृत्यूचे कारण रक्तदाब हेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे. मात्र, भारतीय लोक दररोज १०-२० ग्रॅम मीठ खातात. बेकरीच्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. चहा, कॉफीच्या सेवनामधूनही शरीरात मोठ्या प्रमाणात साखर जाते.
डॉ. राहुल जोशी म्हणाले, ‘तरूणांमध्ये वाढता लठ्ठपणा ही चिंतेची बाब असून यामुळे उच्च रक्तदाबाची जोखीम वाढत आहे. तंबाखू सेवन, धुम्रपान आणि चुकीची जीवनशैली देखील मुख्य जोखमीचे घटक ठरू शकतात. ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांच्या मते इतरांपेक्षा जास्त जोखीम असू शकते. ज्यांना सध्या उच्च रक्तादाबाचा त्रास नाही, त्यांच्यासाठी चांगली जीवनशैली ही गुरूकिल्ली ठरू शकते.’
रक्तदाब वाढण्याची कारणे
- अनुवंशिकता हे उच्च रक्तदाबामागील मुख्य कारण आहे.- टीव्हीसमोर बसून राहणे, मोबाईल गरजेपेक्षा जास्त वेळ खेळताना मुलांच्या हालचाली कमी होतात आणि परिणामी वजन वाढते.- आहाराच मिठाचा अतिवापर, जंक फूडचे सेवन- ताणतणाव, बैैठी जीवनशैैली, व्यायमाचा अभाव- लठ्ठपणा
काय काळजी घ्यावी?
- जेवणात मिठाचा अतिरेक टाळावा.- दिवसातून चारवेळा पोटभर खाणे बंद करावे.- वजन संतुलित राखण्यावर भर असावा.- आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवावे- व्यायाम आणि योगासनांवर भर द्यावा
चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा
‘बैठे काम वाढले की साखरेचे कण एकत्र जोडून चरबी तयार होते. मुलांचा टीव्हीसमोरचा वेळ वाढला की पोटही वाढते. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, रक्तदाब ५ अंकांनी वाढल्यास जीवनशैलीत बदल केला पाहिजे आणि १० अंकांनी वाढल्यास औषधोपचार सुरू केले पाहिजेत. नेहमीपेक्षा १ कप चहा जास्त प्यायल्यास शरीरात ५४ कॅलरी जास्त जातात. याप्रमाणे, वर्षाला ३ किलो वजन वाढते आणि पर्यायाने उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा. सध्या चहा ४०० रुपये किलो आहे. त्यापेक्षा जेवण स्वस्त आहे असे डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितले.'