प्रवीण गायकवाड, शिरूरघोड नदीवर ब्रिटिशांनी बांधलेला दगडी पूल १४६ वर्षे भक्कम स्थितीत उभा आहे. अजून ४ वर्षांनी या पुलाला १५0 वर्षे पूर्ण होतील; मात्र त्याला अद्याप तडा गेलेला नाही. इंग्रजानी घोड नदीवर (शिरूरजवळ) १४६ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे आयुष्य १५० वर्षे आहे. आधुनिकीकरणाचा अभाव असताना उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजांच्या काळात उभारलेल्या इमारती देशभरात पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे यातील बहुतांशी सर्वच इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत. पुण्याहून ६५ किलोमीटर असणाऱ्या शिरूरला आल्यावर विदर्भाला जोडण्यासाठी १८६६ साली घोड नदीवर पुलाचे काम सुरू करण्यात आले. संपूर्ण दगडी असलेले २४० मीटर लांबीच्या, १०.४० मीटर रुंदीच्या, ११ मीटर उंचीच्या पुलाचे काम त्या वेळी फक्त एका वर्षात पूर्ण करण्यात आले. १८६७ साली हा पूल वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्या वेळी या पुलाला केवळ १ लाख ४ हजार रुपये एवढा खर्च आला. या पुलाला १२.२० मीटर लांबीचे असे १७ गाळे असून, त्यास १७ कमानीचा पूल म्हणून संबोधले जाते. प्रत्येक कमानीची जाडी ७० सेंटिमीटर एवढी आहे. दगडांचे काम म्हटल्यावर फक्त साधे दगडच या बांधकामासाठी वापरण्यात आले नाहीत, तर दोन गाळ्यांच्या मध्ये आकर्षक डिझाईनचे घडीव दगड बसवण्यात आले आहेत. कॅप्टन रॉज सेलॉन यांच्या रॉयल इंजिनिअर्सने या भक्कम कामाची उभारणी केली आहे. शिरूर-पुणे चौपदरीकरणाच्या कामावेळी २००९ साली या सतरा कमानी पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला. चार वर्षांत या पुलाची परिस्थिती पाहता पुलावरील रस्त्याची अनेकदा डागडुजी करावी लागली. मध्यंतरी या रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. गजही बाहेर आले होते. आजही १४६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सतरा कमानी पूल शतपटीने मजबूत व भरवशाचा वाटतो. या पुलाच्या कामाचा आदर्श आपले प्रशासन कधी तरी घेईल का? हा खरा प्रश्न आहे.
शिरूरच्या घोड नदीवरील दगडी पुलाची नाबाद १४६ वर्षे
By admin | Published: December 22, 2014 5:27 AM