पुणे : मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर पुणे विभागात गेल्या आठ दिवसांमध्ये दोनवेळा दगडफेक झाल्याचे उघड झाले आहे. या दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली तरी, रेल्वेची काच फुटली असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन झाले होते. या दोन्ही वंदे भारत रेल्वेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वे पुण्यामार्गे धावते. या रेल्वेला पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, या रेल्वेवर पुणे विभागात मागील काही दिवसांमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वंदे भारत रेल्वेवर गुरूवारी (२० एप्रिल) लोणावळा जवळ आणि शनिवारी (२२ एप्रिल) हडपसर जवळ दगडफेक झाली आहे. यात रेल्वेची काच फुटली असून, प्रवाशांना कोणतीही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वंदे भारत रेल्वेवर होणाऱ्या दगडफेकींच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा, पुणे-मिरज आणि पुणे-दौंड असे तीन मार्ग आहेत. या तिन्ही मार्गांवर दररोज अडीचशेपेक्षा अधिक गाड्या धावतात. त्यामध्ये लोकल, डेमू बरोबच एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांवर अनेकदा दडफेकीच्या घटना घडतात. २०२२ मध्ये पुणे विभागात ३० दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. वारंवार दगडफेकीच्या घटना होणाऱ्या ठिकाणी आरपीएफच्या जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या जवानांकडून या परिसरात जनजागृती देखील केली जात आहे. - उदयसिंग पवार, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त
नेमकी कुठे होते दगडफेक ?
- पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावर.- लोणावळा मार्गावर तळेगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि शिवाजीनगर.- दौंड मार्गावर घोरपडी, लोणी, मांजरी, उरुळी, यवत आणि कराड.