पुणे : राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाविद्यालयांच्या शिक्षण शुल्काची रक्कम शासनाकडून त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे, पुढील १५ दिवसांमध्ये त्यांनी ती रक्कम महाविद्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यांनी ही रक्कम जमा न केल्यास त्यांचे पुढील वर्षाचे प्रवेश थांबविण्यात यावेत, तसेच निकालही देऊ नये अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना दिल्या आहेत.उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांनी भरायची आहे, तर निम्मी रक्कम शासनाकडून अदा केली जात आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या बँकखात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते.मात्र विद्यार्थ्यांकडून ती महाविद्यालयांकडे जमा केली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्काची रक्कम पूर्वी थेट महाविद्यालयांच्या खात्यामध्ये जमा केली जात होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोट्यवधी रूपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले. त्यामुळे आता ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. अनेकदा अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क हे सहा तेआठ लाखांच्या घरात असते. अशावेळी शुल्काची निम्मी म्हणजे साधारण चार ते साडेचार लाखरुपये रक्कम शासनकडून देण्यात येत आहे. काही महाविद्यालयांकडून शिक्षण शुल्क योजनेचा लाभ दिला जात नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. यापार्श्वभूमीवर उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संचलनालयाने याबाबतचे परिपत्रक काढून संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शुल्क न भरल्यास प्रवेश थांबवा, महाविद्यालयांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:22 AM