लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ''रिक्षा थांबे हवेत'' अशी मागणी करणाऱ्या रिक्षा संघटनेला वाहतूक शाखेने, ''मग जागापण तूम्हीच शोधा'' असा अजब सल्ला दिला आहे. परिवहन आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीतच हा प्रकार झाल्याने आता रिक्षा संघटना जागा शोधण्याच्या प्रयत्नाला लागली आहे.
मागील १० ते १२ वर्षात शहरात रिक्षा थांब्यांची पुनर्रचनाच झालेली नाही. सन १९९६ मध्ये ५०० थांबे होते. सन २०१० मध्ये ९६७ रिक्षा थांब्यांंना वाहतूक शाखेने मान्यता दिली. दरम्यानच्या काळात रिक्षांची संख्या ७० हजारपेक्षा जास्त झाली आहे. पण सर्व रिक्षा थांबे जुनेच आहेत. त्यातले काही बंद आहेत. मागील काही वर्षात शहराचा बराच मोठा विस्तार झाला आहे. त्या भागात थांबे होण्याची गरज आहे. ते लक्षात घेऊन आम आदमी रिक्षा संघटना, रिक्षा पंचायत तसेच अन्य स्थानिक रिक्षा संघटना यासाठी मागणी करत आहेत.
आम आदमी रिक्षा संघटनेबरोबर यासंदर्भात परिवहन आयुक्तांंनी अलीकडेच बैठक घेतली. नवे थांबे करण्याबाबत सुचना केल्या.
त्याचा पाठपुरावा करत असताना वाहतूक शाखेने आम आदमी रिक्षा संघटनेला, नव्या थांब्यांसाठीच्या जागा तूम्हीच शोधून आम्हाला सांगा, आम्ही त्याचा प्रस्ताव तयार करू असे सांगितले. संघटना आता आपल्या सदस्य रिक्षा चालकांच्या साह्याने शहराच्या मध्यभागासह उपनगरांमध्येही रिक्षा थांब्यांसाठी जागेचा शोध घेत आहे.
----
संघटनेचे किरण कांबळे, उमेश बागडे व यांनी लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता या व्यापारी पेठांसाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यात तिथे सध्या रस्त्याच्या कडेला दुचाकी लावल्या जातात त्या जागेवर तीन किंवा चार रिक्षांसाठी जागा मागितली आहे. दुकानातून ग्राहक बाहेर आल्यावर लगेच रिक्षा मिळणार असल्याने यातून दुकानदार, ग्राहक या दोघांचाही फायदा आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
-----
शहरातील अधिकृत रिक्षांची संख्या- ७० हजार
अनधिकृत रिक्षा- २० ते ३० हजार
एकूण-- १ लाखाच्या आसपास
थांब्यांची संख्या- ९६७
रिक्षा संख्येच्या तुलनेत थांब्यांची गरज- २५००/ -----