दौंड : दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीचे रखडलेले काम राजकारण न करता तातडीने सुरू करावे, तसेच मोरीतील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात यावा, या मागणीसाठी दौंड येथे सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सुमारे अडीच तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रेल्वे मोरी कुरकुंभ परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.येथील शिवाजी चौकात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित आले. गावातून हा मोर्चा रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ आला. या वेळी दौंड नगर परिषदेच्या कार्यपद्धतीविषयी आंदोलकांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. गेल्या दीड वर्षापूर्वी या कामाचे भूमीपूजन झाले असताना आजपर्यंत हे काम सुरू झाले असते तर तिसरी अद्ययावत कुरकुंभ मोरी पूर्ण होऊन शहरातील मोठी समस्या सुटली असती. मात्र, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि राजकीय डावपेचामुळे या मोरीचे काम जाणीवपूर्वक रखडवलेले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. वीरधवल जगदाळे म्हणाले की, या कामाचे श्रेय राष्ट्रवादीला जाऊ नये, म्हणून नगर परिषदेने हेतूपुरस्पर हे काम रखडवलेले आहे. तेव्हा या कामाचे श्रेय नगर परिषदेने घ्यावे. मात्र जनतेच्या हितासाठी राजकारण करू नये. दौंड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अॅड. अजित बलदोटा म्हणाले की, जनतेच्या या विकास कामात अडथळा आणू नक, नाही तर जनता तुम्हाला येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.कुरकुंभ मोरीतून जाताना दुर्गंधी येते. नगर परिषदेचे पदाधिकारी देखील या मोरीतून जातात. त्यांना याचे भान नाही का, असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी यांनी उपस्थित केला़या वेळी नगरसेवक गुरुमुख नारंग, अनिल साळवे, नागसेन धेंडे, अनिल सोनवणे, आबा वाघमारे, सोहेल खान, हरेश ओझा, सागर पाटसकर, अशोक जगदाळे, सुनील शर्मा, संदीपान वाघमोडे, सचिन कुलथे, संतोष जगताप यांची भाषणे झाली. या वेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
दौंड येथे सर्वपक्षीय रास्ता रोको
By admin | Published: August 28, 2015 4:31 AM