पुणे : एखाद्या साहित्यिकाला ‘बालसाहित्यकार’ संबोधणं चुकीचं आहे. कारण बालसाहित्य हा साहित्याचाच एक प्रकार आहे. बालसाहित्याचे लेखन करणारा हा साहित्यिकच असतो. त्यामुळे यापुढील काळात बालसाहित्यकार अशी उपाधी लावणं बंद करा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ न. म. जोशी यांनी दिला.
अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुरस्काराच्या 5 हजार रुपयांच्या रकमेत स्वतःकडील पाच हजारांची भर घालून १० हजार रुपये संस्थेकडे सुपूर्त करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, संस्थेचे विश्वस्त ज.गं.फगरे, संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, सहकार्यवाह सुनील महाजन , कार्यवाह मुकुंद तेलीचरी आदी यावेळी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना जोशी म्हणाले,‘‘ कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक व्यक्तींच्या सहवासामुळे माझं जीवन समृद्ध झालं आहे. आता आयुष्यात काही देणे किंवा घेणे राहिलेले नाही.’’
‘‘रंजन आणि बोध करणारे साहित्य म्हणजे बालसाहित्य. जे साहित्य या व्याख्येत बसत नाही ते बालसाहित्य नाही. तथाकथित पुरोगाम्यांच्या मते मुलांना शिकवण्याची गरज नाही. पण मुलांना हे शिकवावेच लागते. संस्कार करणार जे साहित्य असतं ते बालसाहित्य. अशा शब्दांत जोशी यांनी पुरोगामी मंडळींना सुनावले.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डॉ. न.म जोशी यांनी अनेक विद्यार्थी घडविले. फारच कमी माणसं असतात. ज्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. त्यातीलच एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.जोशी.
श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
....