पुणे : उत्पन्नवाढीसाठी वाहक व चालकांना दररोज किमान ४ हजार रुपयांचे उत्पन्न आणण्याची सक्ती केली जात आहे. कमी उत्पन्न आणणाºया सेवकांची फिक्स ड्युटी रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून हे बेकायदेशीर असल्याचे पीएमटी कामगार संघ (इंटक) ने म्हटले. ही सक्त न थांबविल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. उत्पन वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक व वाहकांना दररोज किमान ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची सक्ती करण्यात आली आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बस प्रवास करण्यासाठी वाहक व चालकांनी प्रोत्साहित करावे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहक व चालकांवर कारवाई करण्याच्या सुचना प्रशासनाने सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत. कमी उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांची फिक्स ड्युटी काढली जात आहे. याबाबत इंटकने आक्षेप घेतला असून पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे ही सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.या कारवाईमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलेला असून त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होत आहे. इतर कारणांमुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे वाहक व चालकांवर बेकायदेशीर व नियमबाह्य कारवाई करू नये. अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे इंटकचे महासचिव नुरूद्दीन इनामदार यांनी गुंडे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
उत्पन्नाची सक्ती थांबवा, अन्यथा न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 7:07 PM