याबाबतचे निवेदन एसटी कामगार संघर्ष युनियनचे माने यांनी राजगुरुनगर आगारप्रमुखांना दिले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मे २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांना नियत तारखेला वेतन मिळत नाही. तसेच जुलै २०२१ चे वेतन औद्योगिक न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात (दि. १४) दिलेल्या आदेश देऊनही अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना दिले नाही. तसेच ऑगस्ट २०२१ महिन्याचेही वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
याबाबतीत महामंडळाचे लक्ष वेधण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या राजगुरुनगर आगारासमोर निदर्शने करण्याचे निवेदन दिले होते. परंतु, पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार सध्याच्या कोवीड परिस्थितीत निदर्शने करू नयेत, यामुळे केवळ निवेदन देऊन कामगारांची मागणी आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत. महामंडळ आणि संबंधितांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
निवेदन देताना माने यांचे समवेत अशोक शेगडे, जालिंदर पोटे, तुकाराम शिरसाठ, मंगेश शिंगाडे, विलास जाधव, सोमा भोर, किरण वाघचौरे आदी एसटी कर्मचारी उपस्थित होते.